सिल्लोड, (प्रतिनिधी) शहरातील सहारा सिटी परिसरात अज्ञात चोरट्याने घराच्या जिन्यातील दरवाजाचे कुलूप व कडी- कोंयडा तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील ८० हजार रुपये रोख आणि २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेपासून १५ ऑक्टोबर रोजी रात्री १.१५ वाजेच्या दरम्यान घडली.
शेख मुश्ताक इसाक (वय ४०) रा. सहारा सिटी सिल्लोड यांच्या घरात ही चोरी झाली. ते पत्नी व मुलीसह नातेवाइकांकडे बाहेरगावी गेले होते. याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात घुसून चोरी केली. १५ ऑक्टोबरच्या रात्री १.३० वाजता ते बाहेर गावाहून परत आले, असता त्यांना घरातील दिवे बंद दिसल्याने शेख मुश्ताक यांनी घरात जाऊन पाहणी केली. यावेळी बेडरूममधील लोखंडी कपाटाचे दार उघडे दिसले. कपाटातील लॉकरची चावी वापरून लॉकर उघडण्यात आला होता. त्यातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले.
चोरीस गेलेल्या ऐवजात ८० हजार रुपये रोख, कानातील सोन्याचे झुंबर आणि नाकातील नथणी दागिन्यांची एकूण किंमत २० हजार रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे सहित त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी शेख मस्ताक इसाक यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध सिल्लोड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास प्रमोद भिंगारे करत आहे.













